चिपळूण (प्रतिनिधी) : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलाव परिसरात अखेर पुन्हा एकदा ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर राहणार आहे. चिपळूण नगर पालिकेच्या वतीने या परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून बंद होते. मात्र, आता नगर पालिकेने तातडीची कार्यवाही करत हे सर्व कॅमेरे पुन्हा कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नगर पालिकेने सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च करून नारायण तलावाचे सुशोभीकरण केले आहे. आज हा परिसर सकाळ-संध्याकाळ नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. लहान मुले, विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला तसेच वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने येथे चालण्यासाठी, विश्रांतीसाठी, खेळण्यासाठी येत असतात. सार्वजनिक ठिकाण असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच परिसरातील मालमत्त्ता सुस्थितीत राहावी यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेली कित्येक महिने ते बंद होते. चार ते पाच दिवसांपूर्वी नारायण तलाव परिसरात नमाज पठणाच्या मुद्द्यावरून चिपळूणमध्ये नवा वाद निर्माण झाला होता. या घटनेवर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली होती. नगर पालिकेची मालमत्ता असलेल्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य अशोभनीय असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडे संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे संबंधित व्यक्ती कोण होत्या, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना सार्वजनिक ठिकाणी पुन्हा घडू नयेत, यासाठी नगरपालिकेने तातडीने पावले उचलत नारायण तलाव परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू केले आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याबाबत कार्यवाही केली असून यामुळे आता नारायण तलाव परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काटेकोर नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नारायण तलावावर तिसऱ्या डोळ्याचा वॉच; चिपळूण नगर पालिकेमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे सुरू







