GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यातील देवराईंच्या विकासासाठी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारा; आमदार शेखर निकम यांची अधिवेशनात मागणी

Gramin Varta
16 Views

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी आणि दुर्लक्षित देवराईंचा कायापालट करण्यासाठी तेथे ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ उभारण्याची आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. चिपळूण येथे प्रांत अधिकारी आकाश निघाडे यांच्या पुढाकारातून पाच एकर सरकारी जागेत साकारलेल्या जैवविविधता उद्यानाचा आदर्श समोर ठेवून, जिल्ह्यातील इतर देवराई व देवरहाटीच्या पडीत जागांचा विकास करण्यासाठी शासन पुढाकार घेणार का, असा थेट सवाल निकम यांनी उपस्थित केला. या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत, वनमंत्री गणेश नाईक यांनी अशा उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडताना आमदार निकम म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा आंबा, नारळ आणि फणसाच्या बागांनी समृद्ध असला तरी, जिल्ह्यामध्ये वन खात्याच्या अखत्यारीत येणारी जमीन अत्यंत मर्यादित आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक देवराई आणि देवरहाटीच्या जागा आजही उपलब्ध आहेत, ज्या सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहेत. या जागांवर छोट्या स्वरूपात बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित केल्यास पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, शिवाय स्थानिकांना आणि पर्यटकांना नैसर्गिक विश्रांती स्थळे उपलब्ध होतील. अशा उपक्रमांमुळे जैवविविधतेचे जतन होऊन वन संपदेत भर पडेल, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी आमदार निकम यांच्या सूचनेचे स्वागत केले. रत्नागिरीत वन जमिनीचे प्रमाण कमी असल्याची वस्तुस्थिती मान्य करत, देवराईच्या ठिकाणी असे प्रकल्प राबवणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांनी सुचवलेल्या जागांची पाहणी करून तेथे वन विभागाच्या माध्यमातून स्वच्छता, आसन व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांसाठी निधी खर्च केला जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. तसेच, या प्रक्रियेत स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेऊन देवराईंच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आता जिल्ह्यातील पुरातन देवराईंना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Total Visitor Counter

3205542
Share This Article