रत्नागिरी: ‘शिका आणि कमवा’ ही एक सामाजिक चळवळ असल्याचे प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यासह राज्यभरात पुण्याच्या यशस्वी ग्रुपतर्फे ‘शिका आणि कमवा’ योजना राबविली जाते.
या योजनेच्या ब्रँड ऍम्बॅसिडरपदी प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने ‘अप्रेंटिसशिप सुधारणा अधिनियमः परिणाम आणि भविष्यातील वाटचाल’ या विषयावर वैचारिक मंथन परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले की, केवळ पदव्यांच्या भेंडोळ्या देऊन सुशिक्षित बेरोजगारांची फौज नव्हे, तर शिक्षणाद्वारे कौशल्ययुक्त तरुणांची फळी उभी राहिली पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘शिका आणि कमवा’ योजनेस सामाजिक चळवळीचे स्वरूप द्यावे लागेल. तरुणांची आणि विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांची कौशल्ये विकसित करण्यासाठी यशस्वी ग्रुपतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे, हे अभिमानास्पद आहे. कुशल मनुष्यबळ ही विकसित भारतासाठी महत्त्वाची गरज असून त्यादृष्टीने हे महत्त्वाचे आहे.
ते पुढे म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आल्यापासून शिक्षणाचा चेहरामोहराच बदलला असून व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देण्यात येत आहे. २०२० मध्ये आलेले नवीन शैक्षणिक धोरण हा त्याचाच परिपाक आहे. शिक्षणात प्रचंड लवचिकता आणून त्या लवचिकतेद्वारे विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास कसा साधता येईल यावर भर देण्यात आला आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती आणि दृष्टी कशी विकसित होईल यावर भर दिला आहे. स्टार्टअपमध्ये आज महिला प्रथम, तर पुरुष द्वितीय स्थानावर आहेत. संरक्षण क्षेत्रात एक स्क्रूदेखील बनवू न शकणाऱ्या भारताने आज ब्रह्मोससारखे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
यावेळी प्रवीण तरडे म्हणाले की, ‘शिका आणि कमवा’ ही योजना ग्रामीण भागातील बांधाबांधापर्यंत पोहोचवणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांना या योजनेद्वारे कौशल्याचे धडे देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे ध्येय आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करीत कौशल्याधारित युवकांची फौज निर्माण करण्यासाठी आपल्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे आणि यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, भारत फोर्जच्या एचआर आणि आयआर विभागाचे माजी संचालक डॉ. संतोष भावे, प्रसिद्ध कामगार कायदे सल्लागार तज्ज्ञ ऍड. आदित्य जोशी आणि एनआयपीएमचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विविध औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ विकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी ग्रुपचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक विश्वेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.
रत्नागिरी : प्रवीण तरडे यशस्वी ग्रुपच्या ‘शिका आणि कमवा’ योजनेचे ब्रँड ऍम्बॅसॅडर
