GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर-पाटण घाटमार्गाला मिळणार लवकरच गती; प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

Gramin Varta
219 Views

संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाला गती मिळावी म्हणून घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना पत्र दिले होते. यावर, म्हैसकर यांनी घाटमार्ग मंजुरीचे प्रशासकीय काम प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव कार्यालयाकडून रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवावा, असे पत्राद्वारे आदेश प्राप्त झाले आहेत. त्या आदेशाची एक प्रत संगमेश्वर-पाटण घाटमार्ग समन्वयक समितीचे समन्वयक संतोष येडगे यांना प्राप्त झाले आहे. तसेच, रत्नागिरी अधीक्षक अभियंता यांनी मंत्रालयात पाठवलेल्या प्रस्तावाची माहिती संतोष येडगे यांना अवगत करावी, अशा स्पष्ट सूचना बांधकाम सचिवाकडून देण्यात आल्या आहेत.

संगमेश्वर ते पाटण या ४६ किलोमीटरमधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च कंपनीला दिले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्याची जबाबदारी या कंपनीकडे आहे. डीपीआरसाठीच्या निधीसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता. संगमेश्वरपासून सुरू होणाऱ्या या घाटमार्गाचा फायदा हातखंबा, रत्नागिरी, बावनदी, आंबेड, कोसुंब, करंबेळे, वाशी, धामणी तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, पाचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे, नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे आदी खाडीपट्ट्यातील सह्याद्रीरांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परिसरातील गावांमधील लाखो नागरिकांना होणार आहे.

Total Visitor Counter

3206099
Share This Article