GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी किनाऱ्यांवर ‘लायन्स मेन’ जेलीफिशचा धोका; पर्यटकांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन!

Gramin Varta
397 Views

रत्नागिरी: रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या एका विषारी जेलीफिशचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. ‘लायन्स मेन’ जेलीफिश नावाच्या या विषारी जलचरांचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे तातडीचे आवाहन केले आहे. वादळी स्थिती, खोल समुद्रातील जोरदार वारे आणि बदललेल्या अंतर्गत प्रवाहामुळे खोल समुद्रात आढळणारे हे जेलीफिश मोठ्या संख्येने किनाऱ्याकडील उथळ भागाकडे फेकले गेले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटकांनी गजबजलेल्या किनाऱ्यांवर धोक्याची घंटा वाजली आहे.

रत्नागिरीतील आरे-वारे, गणपतीपुळे, माडबन, साखरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये व मालगुंडसारख्या किनाऱ्यांवर वाळूत अडकल्याने हजारो जेलीफिश मृतावस्थेत आढळत आहेत. मृत असले तरी त्यांचे विषारी तंतू धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे किनाऱ्यांवर फिरतानाही नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. या जेलीफिशचा रंग जांभळा असून त्याचा आकार दूरून सिंहाच्या आयाळाप्रमाणे दिसतो, यावरूनच त्याला हे नाव पडले आहे. हे जेलीफिश साधारणपणे २० ते २५ वाव खोल समुद्रात आढळतात आणि समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत राहतात. या जेलीफिशची शुंडके अत्यंत विषारी असतात आणि त्यांचा मानवी त्वचेशी स्पर्श झाल्यास तीव्र वेदना होतात.

या जेलीफिशच्या वाढत्या प्रमाणामुळे रत्नागिरीतील पर्यटन व मासेमारी या दोन्ही महत्त्वाच्या व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन व मत्स्य विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे. मासेमारी करणाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे, कारण मासेमारीच्या जाळ्यांमध्ये मोठ्या संख्येने जेलीफिश अडकत असल्याने जाळ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यटकांना पाण्यात उतरताना खबरदारो आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3369884
Share This Article