GRAMIN SEARCH BANNER

साखरपा-देवरूख मार्गावरील धोकादायक विजेचे खांब तातडीने बदला; माजी सभापती जयसिंग मानेंची मागणी

Gramin Varta
223 Views

साखरपा/ सिकंदर फरास: साखरपा-देवरूख राज्य मार्गावर महावितरणने नुकतेच ३३ केव्ही वाहिनीसाठी नव्याने टाकलेले विद्युत खांब अत्यंत धोकादायक पद्धतीने रस्त्यालगत उभे करण्यात आल्याने अपघाताची मोठी भीती निर्माण झाली आहे. हे खांब तातडीने हटवून महामार्गापासून सुरक्षित अंतरावर उभे करावेत, अशी आग्रही मागणी माजी सभापती जयसिंग माने यांनी केली आहे.

या मार्गावर काही ठिकाणी हे विजेचे खांब थेट रस्त्याच्या साईडपट्टीवरच बसवण्यात आले आहेत. हा संपूर्ण मार्ग घाट रस्त्याचा आणि तीव्र वळणांचा असल्याने ही स्थिती अधिकच चिंतेची ठरत आहे. मुरादपूर ते बावनदी पूलदरम्यान एक छोटा घाटउतार आहे, तर बावनदी पूल ते साखरपादरम्यान सुमारे आठ किलोमीटरचा दुसरा लांबलचक घाट आहे. घाट आणि तीव्र वळणे असल्यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित झाल्यास वाहनचालकाचे नियंत्रण सुटून वाहन सरळ या नव्याने बसवलेल्या खांबावर धडकण्याची दाट शक्यता आहे.

या संभाव्य अपघातामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने या गंभीर विषयाची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे, अपघात घडण्याची वाट न पाहता, माजी सभापती जयसिंग माने यांनी हे धोकादायक विद्युत खांब तत्काळ तिथून काढून महामार्गापासून सुरक्षित अंतरावर योग्य ठिकाणी उभे करण्याची मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3199305
Share This Article