इंडो-जर्मन कराराअंतर्गत मिळाले ऑफर लेटर
सावर्डे : येथील सह्याद्री पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी ऋतूज माळी याची निवड थेट जर्मनीतील नामांकित कंपनीत झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंडो-जर्मन करार कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संधी ऋतूजला प्राप्त झाली आहे.
राज्याचे कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मंत्री मा. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ऋतूज माळी याला औपचारिकरित्या ऑफर लेटर प्रदान करण्यात आले. ही बातमी समजताच संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून ऋतूजच्या यशाचे कौतुक होत असून, विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणा निर्माण झाली आहे.
या यशामागे महाविद्यालयाचे प्रा. दिनेश खानविलकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असून, प्राचार्य डॉ. मंगेश भोसले आणि चेअरमन महादेव जम्मा यांनी ऋतूजचे विशेष अभिनंदन केले आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि आमदार मा. शेखर निकम यांनीही ऋतूजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतूजच्या यशामुळे संपूर्ण संस्थेचे नाव जागतिक पातळीवर उजळले असून, हा क्षण संस्थेच्या आणि परिसराच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.
सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेच्या ऋतूज माळीची थेट जर्मनीतील कंपनीत निवड
