GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार; शेती पिकांसह पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन

Gramin Varta
99 Views

रत्नागिरी: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी काळात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे. जिल्ह्यात येत्या १४ ते १८ जानेवारी दरम्यान हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. या कालावधीत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पुढील काही दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम फळबागांवर होण्याची शक्यता असून आंबा आणि काजू उत्पादकांनी विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे.

आंबा बागायतदारांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असून किमान तापमानात सातत्याने घट झाल्यास झाडांना पुन्हा नवीन मोहोर येण्याची भीती असते. अशी स्थिती उद्भवल्यास जुन्या मोहोरावरील फळगळ होऊ शकते, हे टाळण्यासाठी विद्यापीठाने ५० पी.पी.एम. जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करण्याची शिफारस केली आहे. तसेच मोहोरावरील तुडतुडे आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी वेळापत्रकानुसार कीटकनाशकांची फवारणी करावी, मात्र परागीभवनाच्या काळात फवारणी टाळावी जेणेकरून मित्र किटकांना इजा होणार नाही. काजू बागांमध्येही ढेकण्या आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने लॅम्बडा सायहॅलोथ्रीनसारख्या औषधांचा वापर करण्याचे सुचवण्यात आले आहे.

कोरड्या हवामानामुळे पिकांना त्यांच्या गरजेनुसार पाणी देण्याचे नियोजन करावे. मिरची, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या फळभाज्यांमध्ये खतांची मात्रा देऊन फुलकिडे व पांढरी माशी नियंत्रणासाठी निळे व पिवळे चिकट सापळे वापरावेत. नारळ आणि सुपारीच्या बागांनाही ७ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे, तसेच सुपारीच्या झाडांना खतांचा दुसरा हप्ता देण्याची हीच योग्य वेळ आहे. हळद आणि काळीमिरी पक्व झाली असल्यास त्यांची काढणी करून योग्य पद्धतीने वाळवण्याचे काम हाती घ्यावे. वाढत्या थंडीचा परिणाम पशुधनावर होऊ नये म्हणून गोठ्याच्या खिडक्यांना गोणपाटाचे पडदे लावावेत आणि रात्रीच्या वेळी जनावरांना उबदार वातावरण मिळेल याची खात्री करावी. कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या शेडमध्ये आवश्यकतेनुसार विजेचे बल्ब लावून उष्णता निर्माण करावी, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.

Total Visitor Counter

3198849
Share This Article