डोंबिवली: कोकणच्या समृद्धीसाठी कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले संजय यादवराव यांना कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या वेळी साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे (कोकण साहित्यरत्न), ‘पुण्यनगरी’चे संपादक शैलेंद्र शिर्के (कोकणरत्न पत्रकारिता) व अन्य मान्यवरांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिग्दर्शक, लेखक राजेश देशपांडे (कला), रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड (क्रीडा), अजय आयरे (उद्योग), संदीप परटवलकर (शिक्षण), पोलिस सेवेतील मनिष शिंदे (शौर्य), काजूची नवी जात विकसित करणाऱे अमर खामकर (कृषी), श्रध्दा कळंबटे (सामाजिक) यांनाही कोकणरत्न पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.डोंबिवली येथील मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोकणातील सामाजिक चळवळींचा आधारस्तंभ आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. या वेळी उद्योजक सुनील नारकर, मंदार हळबे, राहुल कामत, माजी सभापती लांजा युवराज हांदे, मराठा मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. सी. ए. परीक्षेत देशात तिसरा आलेल्या शार्दूल विचारे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. माजी विश्वस्त श्रीराम चाळके यांचाही सन्मान करण्यात आला.
भव्य संगीत भजनोत्सवाचे आयोजन
यावेळी आषाढी एकादशीनिमित्त मराठा मंदिरच्या सभागृहात भव्य संगीत भजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या भजनोत्सव स्पर्धेत ३१ भजन मंडळांनी सहभाग घेतला. २१ पुरुष भजन मंडळ आणि १० महिला मंडळांचा यात समावेश होता.
प्रथम क्रमांक पुरुष – कोळंबादेवी प्रसादिक भजन मंडळ
द्वितीय क्रमांक पुरुष – श्री भावई प्रासादिक भजन मंडळ
तृतीय क्रमांक पुरुष – सोमजाई प्रासादिक भजन मंडळ
प्रथम क्रमांक महिला – जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ
द्वितीय क्रमांक महिला – विश्वनाथ भजन मंडळ
तृतीय क्रमांक महिला – तृतीया भजन मंडळ
उत्कृष्ट गायक – भूषण घाडी
उत्कृष्ट गायिका – तृतीया मेस्त्री
उत्कृष्ट पखवाज – साई गावडे
उत्कृष्ट चकवा – दिपेश नाईक
उत्कृष्ट झांज – वरद सिद्धीविनायक मंडळ
मंडळाचे हे नववे वर्ष आहे. परीक्षक म्हणून छाया गद्रे, मंदार दीक्षित, सौरभ करडीकर यांनी तर भजनोत्सवाचे स्पर्धाप्रमुख म्हणून रोशन मोरे, सच्चिदानंद हांदे यांनी काम पाहिले. संस्थेचे संस्थापक धनंजय चाळके यांनी प्रास्ताविक केले. सचिव विराज चव्हाण यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार रोहन मोरे, कुणाल मोरे, शुभम केगडे, साहिल मोरे, समीर मोरे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष दिनेश मोरे यांनी केले.
कोकण युवा प्रतिष्ठानने केला कोकणरत्नांचा सन्मान
