GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पीओपीला भगदाड

Gramin Varta
113 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या चकचकीत बाह्यांगामागील कामातील बोगसगिरी आता हळूहळू उघडकीस येत आहे. नुकताच याचा एक गंभीर नमुना पाहायला मिळाला, जेव्हा मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मदत केंद्राच्या सिलिंगचे ‘पीओपी’ (प्लास्टर ऑफ पॅरिस) मोठ्या भगदाडासह खाली कोसळले. सुदैवाने, या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली, अन्यथा गंभीर दुखापत झाली असती. मात्र, या घटनेमुळे इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

प्रवेशद्वाराजवळच घडलेल्या या घटनेमुळे आता हे भगदाड आणखी मोठे होऊन ते कुठल्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. रुग्णालयात मोठ्या संख्येने ये-जा करणारे वृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्या डोक्यात हे प्लास्टर पडून मोठी हानी होण्याची दाट शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा धोका उभा राहिला असतानाही, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

नव्याने बांधलेल्या या इमारतीच्या कामात झालेली ही बोगसगिरी आणि त्यामुळे निर्माण झालेला धोका पाहता, अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने प्रशासनाने या गंभीर घटनेची पाहणी करावी आणि निकृष्ट, बोगस काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आरोग्य सुविधा देणाऱ्या या महत्त्वाच्या इमारतीतच जर अशाप्रकारे जीवघेणे धोके असतील, तर रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहावे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने आतातरी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

Total Visitor Counter

3377160
Share This Article