GRAMIN SEARCH BANNER

मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील नागरिकाला ११.६० लाखांचा गंडा

Gramin Varta
296 Views

रत्नागिरी: कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका नागरिकाला तब्बल ११ लाख ६० हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या एका अज्ञात महिलेने हा बनावट ‘ट्रेडिंग’ घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्यात गुंतवणूकदार अडकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही फसवणूक ०४ जुलै २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५ या दरम्यान फिर्यादींच्या रत्नागिरीतील राहत्या घरी घडली. फिर्यादींची ‘मारिया’ नावाच्या एका व्यक्तीशी फेसबुकवरून ओळख झाली. मारियाने त्यांचा विश्वास संपादन करून ती ‘ट्रेडिंग सल्लागार’ असल्याचे भासवले. गोल्ड ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत मोठा फायदा होईल, असे आमिष तिने दाखवले. यानंतर तिने व्हॉट्सॲपद्वारे एक लिंक पाठवून ‘TRADNGBEAD’ नावाचे ॲप्लिकेशन फिर्यादींच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. फिर्यादींची दिशाभूल करून त्यांना वेळोवेळी या ॲपमध्ये मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडण्यात आले.

गुंतवणूक करूनही कोणताही लाभ न मिळाल्याने, फिर्यादींनी आपल्या मूळ रकमेची विचारणा केली. तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना धक्कादायक उत्तर दिले. त्यांनी कंपनीच्या नियमांनुसार आधी ६,१३,६४७/- रुपये भरावे लागतील, तसेच ‘मनी लाँड्रिंग’ झाल्यामुळे अकाऊंट संशयास्पद (सस्पेक्टेड) झाले आहे, त्यामुळे सर्व रक्कम भरावी लागेल, असे सांगून त्यांची बोळवण केली. अशाप्रकारे, कोणताही लाभांश न देता, उलट वेगवेगळ्या बहाण्याने पैसे भरण्यास सांगून अज्ञात आरोपींनी फिर्यादींचे एकूण ११ लाख ६० हजार रुपये हडप केले.

या गंभीर सायबर फसवणुकीप्रकरणी पीडित व्यक्तीने ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरीच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी मारिया, ‘TRADNGBEAD’ कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित अकाऊंट होल्डर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या टोळीचा आणि त्यांनी वापरलेल्या आर्थिक व्यवहारांचा सायबर पोलीस कसून तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2652405
Share This Article