खेड : भरणे नाका येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. समोरून भरधाव वेगात आलेल्या एका टँकरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम काशीराम तांबट (वय ५९) हे आपली मोटारसायकल (एमएच ०८ बी बी ६४७२) घेऊन वरवली गावठाणवाडीकडे जात होते. त्यांच्या मागे त्यांचा पुतण्या शुभम शांताराम गोरीवले (वय २७) बसलेला होता. भरणे नाका येथील शिव सुपर मार्केटजवळ समोरून येणाऱ्या एका टँकरची (एमएच १३ डी.क्यू. ७९९०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील शुभम खाली पडला आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
या घटनेनंतर टँकर चालक महमद रफिक मलिकसाहब भोम्मणहल्ली (रा. विजापूर, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले. शांताराम तांबट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी टँकर चालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खेड : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल
