GRAMIN SEARCH BANNER

भारताचा श्रीलंकेवर ५० चेंडू राखून दणदणीत विजय, शफाली वर्मा ठरली स्टार; मालिकेत २-० ने आघाडीवर

Gramin Varta
86 Views

दिल्ली: भारत आणि श्रीलंका महिला संघांमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने शफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.

यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-०ने मजबूत आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाने गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

पहिल्या सामन्याप्रमाणे दुसरा सामनादेखील विशाखापट्टणम येथे खेळवला गेला. या दुसऱ्या सामन्यातही भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी घेतली आणि श्रीलंकेला १२८ धावांवर रोखत विजयाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं. यानंतर फलंदाजीत शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी संघाला विजयापर्यंत नेलं.

श्रीलंकेने दिलेल्या १२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सावध सुरूवात केली. पण स्मृती मानधना चांगली सुरूवात मिळाल्यानंतर एक षटकार व एका चौकारासह १२ धावा करत झेलबाद झाली. स्मृती व शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. यानंतर शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी संघाच्या डावाची जबाबदारी घेतली. दोघींनीही आक्रमक फलंदाजी करत २७ चेंडूत ५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

दरम्यान मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जेमिमा १५ चेंडूत ४ चौकार व एक षटकार लगावत २६ धावा करत झेलबाद झाली. तर शफाली वर्माने उत्कृष्ट अर्धशतक झळकावलं आणि भारताच्या विजयाची स्टार ठरली. शफाली ३४ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ६९ धावा करत नाबाद परतली. तर कर्णधार हरमनप्रीतने १० धावा करत तिला चांगली साथ दिली. यासह भारताने ११.५ षटकांत ५० चेंडू राखत विजय मिळवला.

भारताने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. श्रीलंकेने पहिल्याच षटकात विकेट गमावली. पण त्यांची कर्णधार चमारी अट्टापटू हिने आक्रमक फटकेबाजी केली. पण स्नेह राणाच्या गोलंदाजीवर चमारी २४ चेंडूत ३१ धावा करत झेलबाद झाली. यानंतर हसिनी परेरा व हर्षिता समरविक्रमा यांनी ४४ धावांची भागीदारी रचली. पण अमनजोत व ऋचाने हर्षिताला धावबाद करत ही भागीदारी तोडली आणि यानंतर संघाने लागोपाठ विकेट्स गमावल्या.

भारताकडून पदार्पण केलेल्या वैष्णवी शर्मा हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट मिळवली. तिने या सामन्यात २ विकेट्स घेतल्या. तर श्रीचरणीने देखील २ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय स्नेह राणा व क्रांती गौड यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. तर ऋचा घोषने या सामन्यात ३ धावबाद केले.

Total Visitor Counter

3388237
Share This Article