GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (ठाकरे) शिवानी सावंत-माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Gramin Varta
84 Views

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवानी सावंत-माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रत्नागिरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अर्ज दाखल केल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. “रत्नागिरीकर नागरिक आम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील,” असे त्या म्हणाल्या. तसेच, “माझ्यासोबत महाविकास आघाडीचे सर्व ३२ नगरसेवक उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील,” असा दावाही त्यांनी केला.
यावेळी महाविकास आघाडीच्या एकजुटीचे चित्र दिसून आले. शिवसेना उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या रणनीतीची माहिती दिली. ते म्हणाले, “आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसप) आणि मनसेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.”

पुढे बोलताना बाळ माने यांनी स्पष्ट केले की, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ज्या ठिकाणी दोन अर्ज किंवा डमी अर्ज भरले गेले आहेत, ते मागे घेतले जातील. “आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत आणि रत्नागिरीकर नागरिकांच्या सहकार्याने नक्कीच विजयी होऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आता प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे.

Total Visitor Counter

3377018
Share This Article