दापोली: तालुक्यातील टाळसरे संतोषीमाता नगर येथे एका बंद घरामध्ये ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. सुवर्णा महादेव रीसबुड असे या मृत महिलेचे नाव असून, त्या घरात एकट्याच राहत होत्या. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने आणि खिडकीतून उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुवर्णा रीसबुड या टाळसरे येथील संतोषीमाता नगरमध्ये एका घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्या घराबाहेर पडल्या नसल्याचे आणि परिसरात कुठेही दिसल्या नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाजवळ जाऊन खात्री केली. घराचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी सुवर्णा यांना बाहेरून अनेक हाका मारल्या, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच वेळी घराच्या खिडकीजवळून तीव्र उग्र वास येत असल्याने शेजाऱ्यांना काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला.
या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील विजय सपकाळ आणि शेजारी मंदार जुवेकर यांनी २० मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, बेडरूममध्ये खाटेजवळ सुवर्णा महादेव रीसबुड यांचे प्रेत पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आढळून आले. चार दिवसांपूर्वीच त्यांचा घरात मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
याप्रकरणी मयत सुवर्णा रीसबुड यांची सून प्राची प्रभाकर रीसबुड (वय ४६ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. सुखदर मराठवाडी, ता. खेड) यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या माहितीवरून २० मे २०२६ रोजी सायंकाळी १९.०५ वाजता दापोली पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ नुसार नोंद केली आहे. या वृद्ध महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.






