रत्नागिरी: येथील आरएचपी फाउंडेशनच्या पुढाकाराने विमा प्रतिनिधी सौ. सुनेत्रा तांबे यांच्याकडून स्मिता पाटील या दिव्यांग व्यक्तीला व्हील चेअर मिळवून देण्यात आली.
कु. स्मिता पद्माकर पाटील (वय ४६, शिक्षण सातवी, मु. भंडारपुळे, ता. रत्नागिरी) एक वर्षाच्या असताना तापात त्यांच्या दोन्ही पायांना पोलिओ झाला. चालता कधीच आले नाही. सातवीपर्यंत गावातील शाळेत आई उचलून घेऊन जायची. पुढील शिक्षणासाठी मालगुंड येथे जावे लागले असते. ते शक्य नसल्याने सातवीतूनच शाळा सोडावी लागली. वडील शेती करायचे, तर आई गृहीणी आहेत. दोन भाऊ, दोन बहिणी असून सर्व विवाहित आहेत.
सुरवातीला घरात रांगतच सर्व गोष्टी कराव्या लागायच्या. बाहेर जाताना उचलूनच न्यावे लागायचे. नंतर जिल्हा रुग्णालयातून व्हीलचेअर मिळाली. त्यामुळे थोड बाहेर जाणे-येणे सोपे झाले. घरातच शिवणकाम सुरू केले. त्यालाही खूप उपयोग होत होता.
कालांतराने ती व्हीलचेअर खराब झाली.
स्मिताच्या भावाने आरएचपी फाउंडेशनला व्हीलचेअर संदर्भात संपर्क साधला. संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी स्मिताची सविस्तर माहिती घेतली. संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांच्याकडे त्यांच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील सहकारी विमा प्रतिनिधी सौ. सुनेत्रा संजय तांबे यांनी दिव्यांगासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे समीर नाकाडे यांनी सौ. तांबे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी दिव्यांग कु. स्मिता पाटील यांना उपयुक्त अशी व्हीलचेअरची मदत केली. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी सौ. सुनेत्रा तांबे व आरएचपी फाऊंडेशनचे आभार मानले.
व्हीलचेअर सुपूर्द करताना विमा प्रतिनिधी सौ.सुनेत्रा तांबे, आरएचपी फाऊंडेशनचे संस्थापक सादिक नाकाडे, स्वानंदी पाटील आणि अमर आढाव उपस्थित होते.
रत्नागिरी : विमा प्रतिनिधी सुनेत्रा तांबे यांच्याकडून दिव्यांग व्यक्तीस व्हील चेअरचे वाटप
