रत्नागिरी: न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याने आणि संमतीने कायदेशीर वाद मिटवण्याचे एक प्रभावी व्यासपीठ असलेल्या ‘लोक अदालत’मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७ अंतर्गत कायदेशीर मान्यता प्राप्त असलेल्या या लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलाने प्रभावी समन्वय आणि योग्य पाठपुरावा करत एकूण १०५ प्रकरणांमध्ये यशस्वीरित्या तडजोड घडवून आणली आहे.
रत्नागिरी जिल्हा स्तरावर स्थानिक विधी सेवा समित्यांमार्फत शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी या ‘लोक अदालतीचे’ विशेष आयोजन करण्यात आले होते.
या लोक अदालतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाण्यांमधील १६८ प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १०५ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांच्या सहमतीने निकाली कार्यवाही करण्यात पोलिसांना यश आले. लोक अदालतीमध्ये तडजोड व समेटाच्या माध्यमातून वाद मिटवले जात असल्याने येथे कोणत्याही पक्षाची हार किंवा जीत होत नाही, तर परस्पर सहमतीने योग्य तोडगा काढला जातो.
जिल्हा पोलीस दलाने घेतलेल्या या पुढाकारामुळे न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा नागरिकांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. या व्यासपीठामुळे दोन्ही पक्षांच्या सहमतीने जलद, सुलभ व मोफत न्याय मिळवून दिला जातो आणि याचा निर्णय अंतिम व सर्व पक्षांवर बंधनकारक असतो. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राबवलेल्या या प्रभावी कायदेशीर प्रक्रियेचे व यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





