रत्नागिरी: येथील अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. २७ जुलै रोजी रत्नागिरीत होणार आहे.
श्री.आगाशे स्वतः योग शिक्षक असून १५ वर्षांपेक्षा अधिक काळ ॐ साई सांस्कृतिक भवनात निःशुल्क योग वर्ग घेत आहेत. त्यांनी पुस्तकाचे लेखन त्यांचे सहकारी मिलिंद सरदेसाई यांच्या सहकार्याने केले आहे. या पुस्तकातून नवीन योग शिकू इच्छिणाऱ्या लोकांना थोडासा सराव आणि पुस्तक वाचून घरी योग-प्राणायाम करता येईल. सर्व नागरिकांनी दररोज या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्काराचा सराव करावा आणि निरोगी राहावे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या पदोपदी सर्वांनाच भेडसावत आहेत. बदलती जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे कशाला महत्त्व द्यायचे याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा, यासाठी लिहिलेले हे पुस्तक रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील ॐ साई सांस्कृतिक भवनात होणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग, पतंजली योग समितीचे संघटन मंत्री विनय साने, सहयोग शिक्षिका सौ. पौर्णिमाताई दाते उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. आगाशे यांनी केले आहे.
मंत्र आरोग्याचा पुस्तकाचे रविवारी रत्नागिरीत प्रकाशन
