भातशेतीही धोक्यात; ग्रामस्थच करतात रस्त्याची दुरुस्ती
चिपळूण : तालुक्यातील गोंधळे ते पोसरे दरम्यान तांबी नदीवर गेल्या काही वर्षापुर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलावरून वाहतूकीसाठी मातीचा भराव करून रस्ता करण्यात आला. मात्र पक्का रस्ता नसल्याने येथून वाहतूक सुरू झालेली नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक तेथे मोरीचे बांधकाम नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची शेती पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे १५ ऑगष्ट रोजी पुलाजवळील रस्त्यावर उपोषण छेडण्याचा इशारा गोंधळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्ववारे दिला आहे.
गोंधळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनानुसार, गोंधळे ग्रामपंचायत क्षेत्रात तांबी नदीवर गोंधळे ते पोसरे हा पूल बांधून पुलाच्या दोन्ही बाजूस मातीच्या भरावाचे काम झाले आहे. मात्र रस्त्याचे मजबूतीकरण न झाल्याने पावसाळ्यात येथून वाहतूक बंद राहते. चिखल आणि निसरडा रस्ता झाल्याने येथून चालनेही शक्य होत नाही. पोसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने विविध वैद्यकीय उपचारासाठी गोंधळे ग्रामस्थांना याच रस्त्यावरून आरोग्य केंद्रात जावे लागते. तसेच पंचक्रोशीतील हा महत्वाचा रस्ता मार्ग आहे. या रस्त्याच्या कामाकरिता टाकलेल्या मातीच्या भरावामुळे नदीपात्रातील पाणी अडले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था येथे केलेली नाही. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या शेतजमिनी खराब होत आहेत. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिली आहे. अनेकदा प्रत्यक्ष जागेवरची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांना दाखवली देखील. रस्त्याच्या भरावाचे काम सुरु असताना संबधित अधिकाऱ्यांना भविष्यातील उदभवणाऱ्या समस्यांची माहिती दिली होती. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची सूचना केली होती. या रस्त्यावर गोंधळे व परिसरातील काही लोकांनी परिश्रम व स्वखर्चाने खडी टाकून रस्ता तात्पुरत्या स्वरूपाचा केला. दरवर्षी ग्रामस्थ रस्त्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यासाठी कोणताही शासनाकडून कवडीचा निधी खर्च केला जात नाही. मात्र ग्रामस्थांच्या या परिश्रमाची अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल अथवा कार्यवाही केलेली नाही. नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. गेली पाच सहा वर्षे हीच स्थिती कायम राहिल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अधिकारी दखल घेत नसल्याने न्याय हक्कासाठी १५ ऑगष्ट रोजी ग्रामस्थांना उपोषणाचा इशारा दिला आहे. गोंधळे ते पोसरे अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावा एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर गोंधळे सरपंच भुषण खेडेकर, उपसरपंच प्रकाश बारे, पोसरे येथील अजय मोहिते, लवू मोहिते, मनोज मोहिते, मजरे कौंढर येथील प्रविण जाधव, अरूण जाधव, सतीश जाधव, संजिवनी जाधव, पुजा जाधव, रविंद्र जाधव, राजेंद्र जाधव, स्वप्नाली जाधव, सुरेश जाधव आदी शंभरहून अधिक ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.
चिपळूण: रस्त्यासाठी गोंधळे ग्रामस्थ करणार उपोषण
