खेड: माणगाव ते रत्नागिरी असा प्रवास करत असताना रेल्वेतून पडून एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री खेड तालुक्यातील धामणदेवी येथे उघडकीस आली. अंदाजे ३५ वर्षे वय असलेल्या या व्यक्तीचे दोन्ही पाय गंभीररीत्या निकामी झाले होते, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी येथील मधलीवाडी परिसरात, धामणदेवीमधून उत्तर-दक्षिण जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर मैलाचा दगड क्रमांक १२२/३४ पासून उत्तरेस सुमारे २० फूट अंतरावर, रेल्वे ट्रॅकच्या पूर्वेकडील बाजूला वाढलेल्या गवतात हा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती संजय पांडुरंग बहुतुले (वय ५४, पोलीस पाटील, रा. धामणदेवी, गवळीवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात माणगाव ते रत्नागिरी असे ५० रुपयांचे रेल्वे तिकीट सापडले आहे, ज्यामुळे तो रेल्वेने प्रवास करत असताना पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अमू. क्रमांक ७१/२०२५ अन्वये, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.