आमदार चषक राज्यस्तरीय सीजन बॉल स्पर्धेचा समारोप
चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आमदार चषक राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरू आहे. या स्पर्धेचा समारोप रविवारी दुपारी दोन वाजता होणार असून अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी क्रिकेटपटू राजेश पवार उपस्थित राहणार आहेत.
राजेश पवार यांनी अवघ्या १६ व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी ८४ सामन्यांत तब्बल २८१ बळी घेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. त्यांनी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले होते. १९९८ साली झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, अमित पागनीस यांच्यासह त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
त्या काळात मुंबई संघात साईराज बहुतुळे, निलेश कुलकर्णी आणि रमेश पवार यांसारखे दर्जेदार फिरकीपटू असल्याने राजेश पवार यांना मर्यादित संधी मिळाली. मात्र त्यांनी बडोदा संघाकडून रणजी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९९९-२००० च्या हंगामात त्यांनी ४४ बळी घेत विशेष कामगिरी नोंदवली.
२००७ मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात अनिल कुंबळे आणि रमेश पवार यांच्यासह त्यांची निवड झाली होती, मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणाची संधी मिळाली नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी इंडियन ऑइल आणि नॅशनल क्रिकेट क्लबकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली.
उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीसोबतच उपयुक्त फलंदाजी करत त्यांनी अनेकदा संघाला संकटातून बाहेर काढले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष रंगत येणार आहे.
मुंबईचे फिरकीपटू राजेश पवार रविवारी चिपळुणात







