रत्नागिरी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर फॅन पार्कच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये कोकणातील रत्नागिरी शहराचा समावेश करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाचा आनंद स्टेडियमबाहेरही सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. देशभरातील ११ राज्यांमधील १५ शहरांमध्ये पहिल्या तीन आठवड्यांत हे फॅन पार्क आयोजित केले जाणार असून, यामध्ये रत्नागिरीसह महाराष्ट्रातील नागपूर शहरालाही स्थान मिळाले आहे. या उपक्रमामुळे क्रिकेट चाहत्यांना सामुदायिक वातावरणात मोठ्या पडद्यावर सामन्यांचा थेट आनंद लुटता येणार आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार, रत्नागिरीमध्ये तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी फॅन पार्कचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमात केवळ सामन्यांचे थेट प्रक्षेपणच नव्हे, तर संगीत, मनोरंजन, फूड कोर्ट आणि मुलांसाठी विशेष खेळांच्या जागाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी व्हर्च्युअल बॅटिंग, बॉलिंग नेट्स, फेस पेंटिंग, चीअर मीटर आणि ३६०-डिग्री फोटो बूथ यांसारख्या आधुनिक सुविधांचे आकर्षण असणार आहे. बीसीसीआयने २०१५ मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश आयपीएलचा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हा असून, रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींमध्ये या घोषणेमुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
पहिल्या टप्प्यातील उपक्रम २८ मार्चपासून सुरू होणार असून, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही विभागांमधील शहरांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यात नागपूरसह भोपाळ आणि रोहतक सारख्या शहरांमध्ये फॅन पार्क असतील, तर तिसऱ्या आठवड्यात रत्नागिरीसोबतच मेरठ, नडियाद, कोईम्बतूर आणि रुरकेला या शहरांची निवड झाली आहे. आगामी काही दिवसांत पुढील टप्प्यातील शहरांची घोषणा केली जाणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे लाखो क्रिकेट चाहत्यांना आपल्या हक्काच्या शहरात बसून आयपीएलचा जल्लोष साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळणार







