रत्नागिरी: देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तिरंगा रॅली, अमली पदार्थ मुक्त रत्नागिरी दौड आणि स्वच्छता मोहिमेचा समावेश होता. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पोलीस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि ७० हून अधिक पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ असा संदेश देत ही रॅली काढण्यात आली.
त्यानंतर, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘अमली पदार्थ मुक्त रत्नागिरी दौड’ आयोजित करण्यात आली होती. ५ किलोमीटरच्या या दौडीमध्ये पोलीस मुख्यालयापासून भाट्ये समुद्र किनाऱ्यापर्यंतचा मार्ग समाविष्ट होता. या दौडीत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, लायन्स क्लब आणि रत्नागिरी सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य, तसेच २०० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या दौडीनंतर भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता: स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ असा संदेश देत पोलीस दलाने समुद्र किनाऱ्यावरील कचरा, विशेषतः प्लास्टिक गोळा केला.
दौडीच्या शेवटी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच, भारत सरकारने सुरू केलेल्या ‘फिट इंडिया चळवळी’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी स्वतः भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. ‘से नो टू ड्रग्स’ या घोषवाक्यासह या उपक्रमाची सांगता झाली.