GRAMIN SEARCH BANNER

शरद नवाळे यांच्या ‘शेवंता’ कादंबरीला राज्यस्तरीय ‘प्रज्ञा प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

रत्नागिरी: प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रकाशित साहित्य पुरस्कार स्पर्धेत देवाचे गोठणे गावचे सुपुत्र, कवी व लेखक शरद यशवंत नवाळे यांच्या ‘शेवंता’ या कादंबरीला मानाचा ‘प्रज्ञा प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रामीण वास्तव, स्त्रीजीवनातील संघर्ष आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण करणाऱ्या या कादंबरीची साहित्य क्षेत्रात विशेष दखल घेतली गेली आहे. या गौरवपूर्ण यशामुळे शरद नवाळे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा ५ एप्रिल २०२६ रोजी बाबुराव धनवटे सभागृह येथे पार पडलेल्या चौदाव्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा लीना देगलूरकर, संमेलनाध्यक्ष श्यामसुंदर गावकर, प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा सुभेदार, स्वागताध्यक्ष डॉ. राजेंद्र केंगार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते शरद नवाळे यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ‘शेवंता’ ही कादंबरी केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची गाथा नसून, ग्रामीण समाजरचनेतील अनेक न बोलल्या गेलेल्या वेदनांना वाचा फोडणारे प्रभावी साहित्य मानले जात आहे. या कादंबरीतील साधी, सहज भाषा आणि पात्रांच्या भावविश्वातील प्रामाणिकपणा वाचकांना विशेष भावला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना शरद नवाळे म्हणाले की, हा सन्मान म्हणजे ग्रामीण जीवनातील सत्यकथांना आणि संघर्षाला मिळालेली एक मोठी मान्यता आहे. या पुरस्कारामुळे लेखणीला अधिक ताकद आणि पुढील प्रवासासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लीना देगलूरकर आणि परीक्षक कर्नल शरदचंद्रजी पाटील यांचे आभार मानले. कोकणच्या मातीतील एका लेखकाने राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सोहळ्याला राज्यभरातील अनेक लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3486650
Share This Article