GRAMIN SEARCH BANNER

खेड : सापिर्ली येथे आंब्याचा झेला नेल्याच्या रागातून वृद्धाला बांबूने मारहाण

Gramin Varta
109 Views

रत्नागिरी: मालकीचा आंब्याचा झेला न विचारता नेल्याचा राग मनात धरून एका ६५ वर्षीय वृद्धाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील सापिर्ली भराडवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आरोपी सतिष श्रीकांत पालांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत कृष्णाजी पालांडे (वय ६५, रा. सापिर्ली, ता. खेड) असे या घटनेत जखमी झालेल्या फिर्यादी वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत पालांडे आणि आरोपी सतिष पालांडे हे एकमेकांचे शेजारी आहेत. आरोपीच्या मालकीचा आंबे काढण्याचा झेला फिर्यादी यांनी आरोपीला न विचारता, त्याच्या वडिलांना विचारून आणला होता. याच गोष्टीचा तीव्र राग मनात धरून आरोपी सतिष पालांडे याने २० मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नांदगाव सापिर्ली भराडवाडी येथे फिर्यादी यांना गाठले. त्याने भरत पालांडे यांना बांबूच्या काठीने पाठीवर जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांचे हाताने गळे दाबून आणि नखांनी चेहऱ्यावर ओरबाडून त्यांना जखमी केले.

यावेळी आरोपीने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या वृद्ध आईला देखील धक्काबुक्की केली. या अनपेक्षित हल्ल्यात भरत पालांडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी फिर्यादी यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी २१ मे रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास आरोपी सतिष पालांडे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3451815
Share This Article