GRAMIN SEARCH BANNER

स्मशानभूमीजवळ दबा धरून बसलेल्या पतीचा पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला, खानूमधील प्रकाराने खळबळ

Gramin Varta
501 Views

रत्नागिरी:रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीवर स्मशानभूमीजवळील निर्जनस्थळी दबा धरून बसून लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध मारहाण आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिव्या दीपक सुतार (वय ३९, रा. खानू सुतारवाडी) या रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तावडे खान फार्म येथील आपले काम आटोपून घराकडे पायी चालत येत होत्या.

दरम्यान, त्यांचे पती आणि संशयित आरोपी दीपक कृष्णा सुतार हे वाटेत असलेल्या बौद्धवाडी स्मशानभूमीजवळील झाडाझुडपात आधीच लपून बसले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास दिव्या या स्मशानभूमीजवळील माळावर पोहोचल्या असता, दीपक सुतार याने अचानक पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. काहीही कारण नसताना हाताच्या थापटांनी आणि लाकडी दांडक्याने दिव्या यांच्या पाठीवर व पायावर बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले.भररस्त्यात गाठून केवळ मारहाण करूनच हा आरोपी पती थांबला नाही, तर त्याने पत्नीला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिली. जखमी दिव्या सुतार यांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला दारूचे व्यसन असून त्यातूनच त्याने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3177521
Share This Article