GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण मतदार यादीतील ४०० दुबार नावे वगळली; नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी

Gramin Varta
28 Views

चिपळूण: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिपळूणमधील मतदार यादी शुद्धीकरणाची मोठी मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार, चिपळूणमधील मतदार यादीत आढळलेली ४०० दुबार नावे हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे मतदार याद्या आता अधिक अचूक होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये झालेली पुनरावृत्ती तपासून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने चिपळूण शहरातून एकूण पंधराशे अर्ज आले होते. परंतु, प्रशासकीय तपासणीत त्यातील अकराशे अर्ज हे चुकीचे आढळले. तपासणीदरम्यान मतदार यादीत चारशे दुबार नावे आढळली, तर शेजारील गुहागरमध्येही ७५ नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले. ही सर्व दुबार नावे प्रशासनाच्या अहवालानुसार आता हटवण्यात आली आहेत. या कार्यवाहीमुळे निवडणूक आयोगाकडून अंतिम परीक्षण झाल्यानंतर नगरपालिकांच्या मतदार याद्या अद्ययावत होणार आहेत. दरम्यान, ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये दोन किंवा तीनवेळा आली होती, त्यांच्या नावाच्यापुढे आता दोन स्टार करण्यात येणार आहेत. दोनवेळा मतदार यादीत आलेली नावे एकाच ठिकाणी ठेवण्याबाबतही कार्यवाही करण्यात आली आहे.

याशिवाय, निवडणुकीतील उमेदवारांना होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. या मर्यादेनुसार, ब वर्ग नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी ११.२५ लाख, तर सदस्यपदासाठी ३.५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, क वर्ग नगर परिषद अध्यक्षपदासाठी ७.५ लाख आणि सदस्यपदासाठी २.५ लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, “आचारसंहिता लागू झाली असून, उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “प्रसारसभांसाठी आधीच परवानगी घेणे आवश्यक आहे आणि लोकप्रतिनिधींचे प्रभागामध्ये ज्या ठिकाणी नाव आहे, त्याच ठिकाणी त्यांना मतदान करण्यास परवानगी आहे. त्या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींना इतर कोणत्याही मतदान केंद्रांवर जाण्यास परवानगी नाही.”

Total Visitor Counter

3073151
Share This Article