रत्नागिरी: हातखंबा परिसरात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने दुचाकी चालवत मोटार कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालक आणि त्यावरील महिला प्रवासी दोघेही जखमी झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास ही घटना हातखंबा येथील हॉटेल अलंकारच्या अलीकडे असलेल्या आरएमसी प्लांटसमोर घडली. त्यावेळी फिर्यादी अमोघ उल्हास मुळ्ये हे आपली होंडा सिटी कार (एमएच ०८ एजी २३०६) घेऊन रत्नागिरीहून कवळाझोंडीच्या दिशेने जात होते. पानवल फाटा ते हातखंबा दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक बंद करून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. कार चालक मुळ्ये हे समोरून ट्रक येत असल्याचे पाहून आपली कार दुभाजकाच्या बाजूला उभी केली होती.
त्याच वेळी समोरून ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या मोटार सायकल (एमएच ०८ बीएफ ६६१५) वरील चालक आरोपी प्रतीक संदीप जोशी (रा. अंजणारी, जोशीवाडी) याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्याने आपली दुचाकी भरधाव वेगाने चालवत उभ्या असलेल्या कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकी चालक प्रतीक जोशी आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या सौ. स्नेहल प्रतीक जोशी या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल स्पेश रघुनाथ भिसे यांनी करून २० जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
हातखंब्याजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल






