GRAMIN SEARCH BANNER

डॉक्टरांशी भिडणाऱ्या ‘त्या’ मद्यपीची मस्ती संगमेश्वर पोलिसांनी जिरवली; रुग्णालयात धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

संगमेश्वर/एजाज पटेल : अतिप्राशन करून शुद्ध हरपलेल्या एका मद्यपीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अक्षरशः धुमाकूळ घालत वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत शांततेचा भंग करणाऱ्या आणि डॉक्टरांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणाऱ्या रविंद्र भागोजी जाधव याच्यावर संगमेश्वर पोलिसांनी आता कायद्याचा बडगा उगारला आहे.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी रविंद्र जाधव याने दारूच्या नशेत बरळत ग्रामीण रुग्णालयाचा परिसर डोक्यावर घेतला. रुग्णालय हे शांतता क्षेत्र असतानाही या आरोपीने तिथे मोठमोठ्याने आरडाओरडा करत आणि विचित्र हातवारे करत धिंगाणा घातला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजित अनंत मोरे यांनी त्याला समजावण्याचा आणि आवरण्याचा प्रयत्न केला असता, या मद्यपीने चक्क डॉक्टरांशीच हुज्जत घालून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले होते.

या उद्धट प्रकाराची दखल घेत डॉक्टर मोरे यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. एस. कोष्टी यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) (२), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि डॉक्टरांना विनाकारण त्रास देणाऱ्या अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार व्ही. व्ही. मनवल हे करत असून आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. अशा मद्यपींमुळे सामान्य नागरिकांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3485114
Share This Article