GRAMIN SEARCH BANNER

निढळेवाडीतील दूषित नळपाणी प्रकरण गंभीर; बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे

Gramin Varta
648 Views

दुसऱ्या दिवशीही नळांतून कुजलेले जलचर अवशेष व दुर्गंधीयुक्त पाणी

संगमेश्वर / एजाज पटेल : संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी गावात नळपाणीपुरवठ्यातून कुजलेले जलचर प्राण्यांचे अवशेष व तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संपूर्ण गावात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक पाहणीत असे निष्पन्न झाले आहे की, पाणीपुरवठा यंत्रणेत काही दिवसांपूर्वी मृत झालेले जलचर प्राणी अडकले असून त्यांचे कुजलेले अवशेष नळावाटे काही घराघरात पोहोचत आहेत.

या दूषित पाण्यामुळे गंभीर पाणीजन्य आजार पसरण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना काही दिवस पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी नळपाणी वापरण्यास सक्त मनाई केली आहे.

या घटनेची बातमी वृत्तपत्रात व समाजमाध्यमांवर झळकताच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामविस्तार अधिकारी पारसे यांच्यासह वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक तातडीने निढलेवाडी गावात दाखल झाले. यावेळी प्रसाद घाटे (आरोग्य सहाय्यक), संदीप खेडस्कर (आरोग्य सहाय्यक), काशिनाथ पवार (आरोग्य सेवक), महेश मोघे (आरोग्य सहाय्यक), शर्मिला बडद (आरोग्य सेविका) आणि साक्षी गिते (आरोग्य स्वयंसेविका) यांनी गावातील विविध ठिकाणच्या नळांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान काही नळ सुरू करताच पाण्यासोबत कुजलेले अवशेष बाहेर येत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले असून पाण्याला असह्य अशी दुर्गंधी येत होती. या प्रकारामुळे उपस्थित अधिकारी आणि ग्रामस्थ हादरून गेले.

आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ग्रामपंचायत प्रशासनाला पाणी शुद्धीकरणासाठी त्वरित उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मेडिक्लोरच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या असून पुढील आठ दिवस नळपाणी पिण्यास व वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.काही स्थानिकांना पाणीपुरवठा जलवाहिनीची तपासणी करताना एका ठिकाणी जलवाहिनी खोलण्यात आली असता, त्या ठिकाणी मोठ्या आकाराचा, जाडजूड व पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असलेला सरपटणाऱ्या प्राण्यासारखा जिवाणू (जलचर प्राणी) आढळून आला. हे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

धक्कादायक म्हणजे, दुसऱ्या दिवशीही काही नळांतून कुजलेले अवशेष व दुर्गंधीयुक्त पाणीच येत असल्याचे पुन्हा एकदा आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमधील संताप आणि भीती अधिकच वाढली आहे. नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारणा केली आहे की, “पुढील आठ दिवस पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी आम्हाला कुठून मिळणार? प्रशासन पर्यायी पाणीपुरवठ्याची ठोस व्यवस्था करणार का?”
ग्रामस्थांनी दोषी पाणीपुरवठा स्रोत तातडीने शोधून त्याची दुरुस्ती करावी, संपूर्ण जलवाहिनी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करावे आणि तोपर्यंत सुरक्षित पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

आरोग्य विभागाच्या  मते, अशा प्रकारचे दूषित पाणी वापरल्यास त्वचारोग, पोटदुखी, जंतुसंसर्ग, पॅरासाइटिक संसर्ग तसेच इतर गंभीर पाणीजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावातील अनेक नागरिकांनी सांगितले की, नळपाण्यातून कुजलेले अवशेष येताना पाहून त्यांना तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक घरात पाणी साठवणे, मेडिक्लोरचा योग्य वापर करणे यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून प्रशासनाकडून तातडीने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अधिक तीव्र होत आहे.

Total Visitor Counter

3072102
Share This Article