GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड : टँकरच्या धडकेत दोन तरुण जखमी, टँकर चालकावर गुन्हा

Gramin Varta
174 Views

मंडणगड: मंडणगड ते म्हाप्रळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बुधवारी (२६ नोव्हेंबर २०२५) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास टँकर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. पाटफाटा, ता. मंडणगड येथे झालेल्या या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या टँकर चालकाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव आणि बेदरकारपणे चालवलेल्या टँकरमुळे दोन तरुण जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या अपघाताप्रकरणी जखमी दुचाकीस्वार तन्मय सतेंद्र देव (वय २८, रा. सेवालालनगर, ता. मंडणगड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, टँकर गाडी क्रमांक KA/२८/९/६३६० चा चालक सुनीलकुमार बलदेवराज यादव (वय ४३, मूळ रा. उन्नाव, उत्तर प्रदेश; सध्या रा. अक्षय कन्स्ट्रक्शन, मंडणगड) याने आपले वाहन अत्यंत भरधाव वेगात चालवले होते. रस्त्याची स्थिती विचारात न घेता त्याने अतिवेगाने, बेदरकारपणे तसेच पूर्णपणे निष्काळजीपणे टँकर चालवला, ज्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

चालकाचा टँकर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तन्मय सतेंद्र देव (वय २८) आणि त्यांच्यासोबत असलेले प्रेमळ पांडुरंग भोजणे (रा. तुळशी, ता. मंडणगड) हे दोघे तरुण रस्त्यावर पडून जखमी झाले. दोघांनाही लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी टँकर चालक सुनीलकुमार यादव याच्यावर भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १२५(अ), १२५(ड), २८१ आणि एमव्हीएके (MVA Act) कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Total Visitor Counter

3199305
Share This Article