दापोली: शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणि मोठ्या फायद्याचे प्रलोभन देऊन दापोली तालुक्यातील एका ७२ वर्षीय वृद्धाची १८ लाख ३७ हजार ४८९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिगंबर दौलत हरेकर (रा. गव्हे लोहारवाडी, जालगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दापोली पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मयंक सिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुकीची साखळी १० डिसेंबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोबाईल कॉल्स, ईमेल आणि टेलिग्रामच्या माध्यमातून सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मयंक सिंग याने फिर्यादी हरेकर यांना परदेशी मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. यावेळी त्याने ‘Proxtrend’ नावाच्या साईटच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक नफा होईल, असे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने फिर्यादीला त्यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करायला सांगून साईनअपच्या नावाखाली त्यांची वैयक्तिक माहिती हस्तगत केली. त्यानंतर डॉलरमध्ये ट्रेडिंग सुरू करण्यास सांगून अधिक नफ्यासाठी वारंवार गुंतवणुकीची गरज असल्याचे भासवले. फिर्यादीने वेळोवेळी आरोपीच्या सांगण्यानुसार ऑनलाईन पद्धतीने पैसे भरले, मात्र अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात फिर्यादीची एकूण १८ लाख ३७ हजार ४८९ रुपयांची फसवणूक झाली असून, पोलीस सध्या संबंधित ईमेल आयडी आणि टेलिग्राम खात्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.







