GRAMIN SEARCH BANNER

पर्यटन हंगामात अपघात टाळण्यासाठी रायगड पोलिसांचा पुढाकार

Gramin Varta
39 Views

रायगड: सध्या हिवाळी पर्यटन हंगाम जोरात सुरू असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रायगड पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल ४२ बीच वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत.

अलिबाग, वरसोली, किहीम, आवास, मांडवा, रेवदंडा, मुरूड, काशीद, दिघी सागरी, श्रीवर्धन, दिवेआगर आदी लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर बीच वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. या बीच वॉर्डनना जिल्हा सुरक्षा शाखेमार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना ओळखपत्रही प्रदान करण्यात आले आहे. प्रशिक्षित बीच वॉर्डन हे संबंधित पोलीस ठाण्याच्या नियंत्रणाखाली काम करणार आहेत.

बीच वॉर्डन दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही अडचण, अपघात किंवा समस्या उद्भवल्यास तत्काळ मदत करणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य असणार आहे.

भरती-ओहोटीच्या वेळापत्रकाबाबत पर्यटकांना सतर्क करणे, समुद्रात अपघात झाल्यास तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देऊन वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, वॉटर स्पोर्ट्स व खाद्यविक्रेत्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देणे, तसेच महिला व मुलींच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष ठेवणे, पर्यटकांचे हरवलेले किंवा सापडलेले साहित्य पोलिसांच्या ताब्यात देणे आदी जबाबदाऱ्या बीच वॉर्डन पार पाडणार आहेत.

अलिबाग पोलीस ठाणे अंतर्गत अलिबाग व वरसोली, मुरूड अंतर्गत काशीद व मुरूड, मांडवा अंतर्गत किहीम, मांडवा, आवास तसेच श्रीवर्धन, दिवेआगर व हरिहरेश्वर परिसरात हे ४२ बीच वॉर्डन तैनात राहणार असून त्यामुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन अधिक सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3072990
Share This Article