मुंबई : मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णच होत नसल्याने कोकणवासीयांच्या प्रवासाचा वनवास संपलेला नाही. नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीविषयीच्या सादरीकरणात ठिकठिकाणी रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर होण्यास आणखी किमान दोन वर्षांचा तरी अवधी लागणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी तयारीच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचे सादरीकरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले. हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्यास अजूनही अडथळ्यांची शर्यत संपलेली नाही. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे काम उड्डाण पुलांचे आहे. माणगाव तसेच इंदापूर शहराला पर्यायी वळणरस्त्याचे काम कंत्राटदारांमुळे अद्यापही अधांतरीच असल्याने वाहतूक कोंडीची समस्याही कायम राहणार आहे.
नागोठणे येथील महामार्गाची दुर्दशा
नागोठणे येथील राष्ट्रीय महामार्गाची तर अक्षरश: दुर्दशा झाली आहे. येथे वारंवार कंत्राटदार बदलून येथील उड्डाणपूल आणि रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत तीन कंत्राटदारांना बदलल्यानंतरही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे.
उड्डाणपूल, रेल्वे पुलांची रखडपट्टी
रायगडमधील कोलाड, लोणेरे, रत्नागिरीमध्ये चिपळूण, संगमेश्वर, निवळी, आरवली, लांजा, पाली येथील महत्त्वाचे उड्डाणपूल वर्षानुवर्षे रखडले आहेत. संगमेश्वर येथील सोनवी नदीपुलाला डिसेंबरची अंतिम तारीख देण्यात आली आहे. तर निवळी उड्डाणपूल, पाली उड्डाणपूल, लांजा उड्डाणपुलांचे काम केवळ ५० टक्केच पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर कळंबस्ते येथील रेल्वेपूल, धामणी रेल्वेपूल यांचेही काम अद्याप सुरू झालेले नाही.
कशेडी बोगद्यात गळती
कशेडीतील वाहतूक बोगद्यातून आता दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. मात्र या बोगद्यात ३३ ठिकाणी पाणीगळती होत होती. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून अजूनही ८-९ ठिकाणी पाणी गळती सुरूच आहे. या बोगद्याला काँक्रीटचे अस्तर घालण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
इंदापूर, माणगाव बाह्यवळण रस्त्यावर प्रश्नचिन्हच
मुंबई-गोवा महामार्गावर सर्वात मोठी तासनतास होणारी वाहतूक कोंडी ही इंदापूर, माणगाव या रायगड जिल्ह्यांतील दोन शहरांत होते. यासाठी बा्हयवळण (बायपास) रस्याचे काम दशकभरापासून प्रलंबित आहे. या ठिकाणी दोनदा कंत्राटदार बदलण्यात आला मात्र काम सुरूच झाले नाही. त्यानंतर आता हे काम निखिल इन्फ्रा. या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने २५ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. काम सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यात प्रगती नाही आणि प्रकल्प पूर्ण होण्याची अंतिम तारीख ही फक्त कागदावरच आहे. या ठिकाणीही रेल्वेपूल तसेच अन्य दोन मोठे पूल उभे करायाचे असून यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. रत्नागितरीतील आरवली ते कांटे दरम्यान दोन कंत्राटदार बदलले संगमेश्वरपासून ते लांज्यापर्यंत आरवली ते कांटे येथील महामार्गाचे कामही धीम्यागतीने सुरू आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून आता हे काम आरवली-कांटे मल्टी प्रोजेक्टरस कंपनीला देण्यात आले आहे. तर आणखी एका टप्प्याचे काम हजूर मल्टी प्रो. कंपनीला देण्यात आले आहे. या टप्प्यातील कामही कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे.
कोकणचा प्रवास सुखकर होण्यास आणखी दोन वर्षे; महामार्गाच्या स्थितीविषयीच्या सादरीकरणात दुरवस्था समोर
