GRAMIN SEARCH BANNER

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट!

Gramin Varta
71 Views

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे  १५ मे रोजी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चाच्या माध्यमातून  सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरणार असल्याची  ठाम भुमिका शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली.

कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने धडक  मोर्चाच्या पार्श्वभुमिवर  राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले कि,  गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडल्यानंतर मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून उद्योगपतींची कर्जे माफ करण्याचा सपाटा लावला आहे व शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडले आहे. यामुळे मुंबईतील सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून हा लढा यशस्वी करेल.  

आंबा उत्पादक , काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही मुख्य शेतकरी सध्या संकटात आहे .चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती , अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार , फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन , कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ मधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र राज्यातील कृषी , फलोत्पादन , मत्स्य विभागाने सर्व उपाययोजना कागदावर केलेल्या आहेत.

दरम्यान शुक्रवारी झालेल्या बैठकीत १५ मे रोजी गिरगांव चौपाटी येथून सायंकाळी ४ वाजता मोर्चा वर्षा निवासस्थानाकडे काढण्याचा निर्णय झाला असून या मोर्चेकरिता शिवसेनेबरोबर , मनसे , राष्ट्रीय कॅाग्रेस , शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह इतर संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

यावेळी खासदार अरविंद सावंत , माजी खासदार विनायक राऊत ,  माजी आमदार बाळ माने , वैभव नाईक , गणेश गावकर , किरण टेंभुलकर , सुशांत नाईक , अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3322779
Share This Article