GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर लाखोंचा खर्च करून बनवलेले सरकते जिने वारंवार बंद, प्रशासन ढिम्म!

लोकप्रतिनिधीनाही देणे घेणे नाही

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे आणि वर्दळीचे रत्नागिरी रेल्वे स्थानक प्रवासी सुविधांच्या बाबतीत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्चून बसवलेले सरकते जिने आणि सरकते पट्टे वारंवार बंद पडत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या बिघाडाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांग प्रवासी आणि महिलांना बसत असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रवाशांचा संताप वाढत आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर फलाटावरून मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी उंच चढ-उतार करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा, प्रवाशांचा वेळ व श्रम वाचावेत, यासाठी सरकते जिने व पट्टे बसवण्यात आले. सुरुवातीच्या काळात ही सुविधा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे जिने कधी बंद, कधी निकामी अशी अवस्था झाल्याचे वारंवार दिसून येत आहे.

रेल्वे गाडी लागल्यानंतर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. अशा वेळी अचानक सरकता जिना बंद असल्याचे समजताच वृद्ध, आजारी आणि अशक्त प्रवाशांची अक्षरशः फरफट होते. हातात जड सामान, सोबत लहान मुले, अशा परिस्थितीत पायऱ्या चढणे अनेकांना अशक्य होते. काहींना इतरांच्या मदतीची वाट पाहावी लागते, तर काही जण वेदना सहन करत कसाबसा मार्ग काढतात. ही अवस्था पाहूनही रेल्वे प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नाही, ही बाब अधिक धक्कादायक आहे.

लाखो रुपयांची सुविधा उभी करून तिच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करणारे स्वतंत्र पथक, नियमित तपासणी आणि देखभाल यांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. परिणामी, प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारी ही यंत्रणा आता ‘डोकेदुखी’ बनली आहे.

या प्रकाराबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासनाने केवळ सुविधा देण्यापुरते न थांबता त्या अखंड सुरू राहतील याची जबाबदारी घ्यावी, अशी ठाम मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही प्रवाशांकडून दिला जात आहे. रत्नागिरीकरांसाठी ही सुविधा शोभेची नव्हे, तर गरजेची आहे; ती प्रत्यक्षात उपयोगी ठरणार कधी, असा सवाल आता सर्वसामान्य प्रवासी उपस्थित करत आहेत.

Total Visitor Counter

3487376
Share This Article