देवरुख: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाच्या कालबद्ध पर्यटन विकासासाठी गाव विकास समितीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजी देवरुख येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गाव विकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काबदुले यांनी दिली आहे.
श्री क्षेत्र मार्लेश्वरचा नियोजनबद्ध पर्यटन विकास झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास गाव विकास समितीने व्यक्त केला आहे.गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे,मंगेश धावडे,राहुल यादव,डॉ.मंगेश कांगणे,श्यामकर्ण भोपळकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार असल्याचे संघटने मार्फत काबदुले यांनी सांगितले.गाव विकास समितीने घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचे काबदुले म्हणाले.
गाव विकास समितीच्या या आंदोलनात अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मार्लेश्वरचा कालबद्ध पर्यटन विकास आराखडा जाहीर करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, पर्यटकांच्या सोयीसाठी भव्य भक्तनिवास उभारावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
वृद्ध भाविकांच्या सोयीसाठी विशेष मागणी
या आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी विशेष मागणी करण्यात आली आहे. देवदर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्यासाठी लिफ्ट किंवा सरकता जिना बसवण्याची मागणी समितीने केली आहे.
उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व प्रसाधन गृह उभारण्याची मागणी
मार्लेश्वर येथील पर्यटन परिसरात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व प्रसाधनगृहे बांधण्याची मागणीही करण्यात आली आहे.याचबरोबर, मार्लेश्वरमधील धबधब्यात आंघोळ करणाऱ्या भाविकांसाठी चेंजिंग रूम्स बांधण्यात याव्यात, अशी मागणीही समितीने केली आहे. ‘एकच ध्यास, गावांचा विकास!’ या घोषणेसह गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा, मार्लेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी हे लक्षवेधी आंदोलन करणार आहे. मार्लेश्वरच्या पर्यटन विकासाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गाव विकास समितीने म्हटले आहे.