GRAMIN SEARCH BANNER

डाटा ऑपरेटर ते संगमेश्वर पंचायत समिती सभापती : शर्वरी प्रथमेश वेल्ये यांची प्रेरणादायी वाटचाल

Gramin Varta
180 Views

धामणी: प्रतिनिधीसंगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावच्या शर्वरी प्रथमेश वेल्ये यांनी डाटा ऑपरेटरपासून ते पंचायत समितीच्या सभापतीपदापर्यंतचा प्रवास करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. सामाजिक काम करताना मिळालेल्या राजकीय बाळकडूमुळे त्यांनी सरपंच पदावरून थेट पंचायत समिती सभापतीपदाची धुरा स्वीकारली आहे. पुढील काळात विकासकामांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.शर्वरी वेल्ये यांना माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंनी राजकीय वारसा लाभला आहे. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांचे आजोबा पोचरी गावचे सलग दहा वर्ष सरपंच होते.

त्यानंतर त्यांच्या वडिलांनीही दहा वर्ष पोचरी गावचे सरपंच म्हणून काम केले आणि पुढे पाच वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून कार्य केले. मात्र त्या लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवला. आईने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही सर्व मुलांना शिक्षण देऊन सक्षम बनवले.लग्नानंतर परचुरी येथे सासरी आल्यानंतरही त्यांना राजकीय वातावरण अनुभवायला मिळाले. त्यांचे सासरे परशुराम वेल्ये परचुरी गावचे दहा वर्ष सरपंच होते. त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी सात वर्ष सरपंच म्हणून काम केले आणि पुढे पंचायत समिती सदस्य तसेच उपसभापती पदही भूषवले. त्यांची राजकीय कारकीर्द शर्वरी वेल्ये यांनी जवळून पाहिली.याच काळात ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळावी म्हणून त्यांनी सासरे सरपंच असताना शेवटच्या दोन वर्षांत ग्रामपंचायतीत डाटा ऑपरेटर म्हणून अडीच वर्ष काम केले. त्यानंतर दोन वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे २०२१ मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या आणि गावच्या विकासासाठी काम सुरू केले.राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी शिवसेना पक्षात कसबा जिल्हा परिषद गटाच्या उपविभाग प्रमुख म्हणूनही काम केले.

पक्षासाठी आणि गावाच्या विकासासाठी निष्ठेने पाच वर्ष काम केल्यानंतर त्यांना पंचायत समिती सदस्य होण्याची संधी मिळाली.पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून आणण्यासाठी पाठबळ दिले तसेच शिवसेनेतही त्यांना महत्त्वाची पदे दिली. आता पंचायत समिती सभापती म्हणून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे शर्वरी वेल्ये यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3148707
Share This Article