संगमेश्वर : संगमेश्वर तालुका आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या वन्य हिंस्त्र प्राण्यांचे मोठे संकट ओढवले असून, यामुळे स्थानिक शेतकरी, वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एरवी घनदाट जंगलात वावरणारे आणि नैसर्गिक अधिवासात राहणारे बिबटे तसेच गवे रेडे आता मानवी वस्तीची भीती बाजूला सारून थेट मुख्य रस्त्यांवर आणि घरांच्या आसपास मुक्त संचार करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ रात्रीच्या अंधारातच नव्हे, तर चक्क दिवसाढवळ्या भर उजेडातही हे वन्य प्राणी रस्त्यांवर उघडपणे वावरत आहेत. एखादे वाहन किंवा माणसांना समोर पाहूनही हे प्राणी कसलीही भीती न बाळगता भर रस्त्यात ठाण मांडून उभे राहत असल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी वर्ग पहाटेपासून शेतात राबत आहे, मात्र या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतात कामाला जावे कसे आणि रस्त्यावरून प्रवास करावा कसा, असा यक्षप्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.
वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील हा संघर्ष आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला असून, यात वन्यजीवांचेही मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी परिसरात रेल्वे अपघात, वाहनांची धडक तसेच शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वन्यजीव सुरक्षित नसल्याची अशीच एक ताजी घटना नुकतीच तुरळ येथे समोर आली असून, येथे एका बिबट्याचा फासकीत अडकून मृत्यू झाला आहे. केवळ बिबटेच नव्हे, तर गव्यांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात अनेक गंभीर प्रसंग निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी गवे रेडे थेट विहिरीत कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. वनविभागाच्या यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढले असले, तरी वेगवेगळ्या अपघातांमध्ये काही गव्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अशातच, नुकतीच जांभूळवाडी ते कुंभारखणी मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका मैदानात भल्यामोठ्या गव्यांचा कळप हैदोस घालताना काही जागरूक वाहनचालकांच्या दृष्टीस पडला आहे. भरवस्तीच्या इतक्या जवळ आणि तेही दिवसा उजेडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्यांचा वावर असल्याने परिसरातील गावांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. या वाढत्या उपद्रवामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून, मानवी जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, हिंस्त्र प्राणी आणि गव्यांचा मानवी वस्तीतील वावर रोखण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करावी आणि या भागातील नागरिकांना भयमुक्त करावे, अशी तीव्र मागणी आता संगमेश्वर तालुक्यातून केली जात आहे.






