रत्नागिरी: रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदरात मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळी खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नबीन मंजुरे सौद (रा. कैलाली, नेपाळ) असे मृत खलाशाचे नाव असून, त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी पांढरा समुद्र येथील पाण्यात तरंगताना मिळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, नबीन हा मिरकरवाडा येथील मोहम्मद हनीफ मक्सद सोलकर यांच्या मालकीच्या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. २५ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ही बोट मासेमारी करून मिरकरवाडा बंदरात परतली होती. बोटीवरील मासे उतरवल्यानंतर नबीन नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत बोटीवरून उतरून गेला होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा बोटीवर आला आणि काही वेळातच नशेत पुन्हा बाहेर निघून गेला. मात्र, त्यानंतर तो परत न आल्याने बोटीवरील सहकाऱ्यांनी आणि मालकांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही.
अखेर २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पांढरा समुद्र येथील पाण्याच्या प्रवाहात एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीअंती हा मृतदेह बेपत्ता खलाशी नबीन सौद याचाच असल्याचे निष्पन्न झाले. अतिमद्यप्राशन करून समुद्राच्या पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






