रत्नागिरी: कावीळच्या आजाराला कंटाळून परटवणे येथील व्यक्तीची आत्महत्या

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: शहरातील परटवणे येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीने आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक प्रकाश खेडेकर (वय ४७, रा. खेडेकरवाडी, परटवणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खेडेकर यांना गेल्या महिन्याभरापासून कावीळचा त्रास होता. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारही सुरू होते. २८ एप्रिल रोजी सकाळी त्यांची पत्नी विनया खेडेकर या नेहमीप्रमाणे घरकामासाठी बाहेर गेल्या होत्या. काम आटोपून सकाळी १०:५२ वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या, तेव्हा अशोक खेडेकर यांनी घराच्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळ्याला फास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शेजारी राहणाऱ्या सुरेश खेडेकर यांना मदतीसाठी बोलावले.

अशोक यांना तातडीने खाली उतरवून रिक्षाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजारपणाच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *