GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये ३८ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण: तालुक्यातील सती परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्निल बुद्धघोष कवडे (वय ३८, राहणार सती शिवसमर्थ पॅलेस बिल्डिंग, रूम नंबर १८) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे सती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निलचे वडील बुद्धघोष शंकर कवडे हे शनिवारी सायंकाळी काही कामासाठी डॉ. गरुड यांच्याकडे गेले होते. सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी श्रद्धा हिने त्यांना फोन करून माहिती दिली की, स्वप्निलने त्याच्या बेडरुममध्ये गळफास लावून घेतला आहे. ही वार्ता समजताच वडिलांनी तातडीने घराकडे धाव घेतली. घरात जाऊन पाहिले असता स्वप्निलने बेडरुममधील सीलिंग फॅनला आकाशी रंगाच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. स्वप्निलने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून स्वप्निलच्या मृत्यूमुळे कवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Total Visitor Counter

3488047
Share This Article