मंडणगड : तालुक्यातील घोसाळे फाटा येथे जमिनीच्या वादातून किंवा रागातून पाळीव जनावरांना विष घालून मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुरघासामध्ये विषारी औषध मिसळून खायला घातल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन म्हशींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाचरळ येथील पशुपालक जतीन बाबाजी झोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी घोसाळे येथील संतोष पांडुरंग घोसाळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जतीन झोरे यांनी आपली गुरे आणि म्हशी चरायला सोडली होती. १० एप्रिल रोजी ते आपल्या जनावरांचा शोध घेत असताना घोसाळे फाटा येथे त्यांना त्यांच्या चार म्हशी रस्त्याशेजारी निपचित पडलेल्या आढळल्या. त्यापैकी दोन म्हशींची कोणतीही हालचाल होत नव्हती, तर दोन म्हशी अत्यवस्थ अवस्थेत होत्या. झोरे यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. म्हस्के यांना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासून दोन म्हशींना मृत घोषित केले, तर इतर दोन म्हशींवर तातडीने उपचार सुरू केले. सध्या एक म्हैस अत्यवस्थ असून दुसरी कशीबशी चालत गोठ्यापर्यंत पोहोचली आहे. याव्यतिरिक्त ८ एप्रिल रोजी चरायला गेलेली अन्य पाच गुरे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेबाबत जतीन झोरे यांनी परिसरात चौकशी केली असता, एका प्रत्यक्षदर्शीने खळबळजनक माहिती दिली. आरोपी संतोष घोसाळकर याने आपल्या बागेत मज्जाव करण्यासाठी किंवा अन्य कारणाने मुरघासामध्ये विषारी औषध मिसळून ते या म्हशींना खायला घातल्याचे समोर आले आहे. मुक्या प्राण्यांना अशा प्रकारे विष देऊन मारण्याच्या या क्रूर कृत्यामुळे मंडणगड परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.






