चिपळूण: दारूच्या नशेत ट्रक चालवत असताना नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील एक ट्रक कुंभार्ली घाटात रस्त्यालगत पलटी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून, त्याच्याविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी पंढरी सोनवाड (वय ३३, रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद प्रमोद आनंदा वायदंडे (वय ३४, अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी सोनवाड हा दारूच्या नशेत त्याच्या ताब्यातील ट्रक हैदराबादहून रत्नागिरीच्या दिशेने चालवत होता. कुंभार्ली घाटातून प्रवास करताना हा घाट वळणाचा आणि तीव्र उताराचा आहे, याची माहिती असतानाही त्याने दारूच्या नशेत ट्रक चालवला. तसेच रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न दिल्याने भरधाव वेगातील ट्रकवरील त्याचे नियंत्रण सुटले. परिणामी, हा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. या अपघातात चालक सोनवाड जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.





