GRAMIN SEARCH BANNER

खेड-भरणे मार्गाच्या दयनीय अवस्थेवरून माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आक्रमक; सार्वजनिक बांधकाम कार्यालयात दिवाळीनंतर ‘फटाके’ फोडण्याचा इशारा

Gramin Varta
92 Views

खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-भरणे या राज्यमार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे खड्ड्यांचे आणि धुळीच्या साम्राज्याचे ग्रहण लागले आहे. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, पादचारी आणि रस्त्याकडेला असलेले दुकानदार दिवसेंदिवस वाढणाऱ्या त्रासामुळे पुरते हैराण झाले आहेत. या गंभीर प्रश्नावर खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची थेट खरडपट्टी काढत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खेड-भरणे मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा मिळूनही त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर खोल खड्डे पडले असून, सतत उडणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत, तर दुकानदारांना अक्षरशः आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. मात्र, नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असतानाही प्रशासन अत्यंत सुस्त असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.

माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला खडसावून सांगितले आहे की, जर दररोज रस्त्यावर टँकरने पाणी मारून धुळीच्या त्रासापासून नागरिकांना त्वरित दिलासा मिळाला नाही, तर दिवाळीनंतर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन फटाके फोडून या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला जाईल.

“रस्त्याच्या सुस्थितीसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात शांतपणे बसू देणार नाही,” असा सज्जड इशाराही खेडेकर यांनी दिला आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी खेडेकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय पाऊल उचलतो, याकडे खेडकरांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3230555
Share This Article