रत्नागिरी: मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, श्रीराम पुरोहित, विजय गावकर आणि संदेश फडकले यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यंदा या पुरस्कारांचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हा सोहळा रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात येत्या शनिवारी (दि. २८) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत असून प्रमुख वक्ते म्हणून अभिजित हरकरे उपस्थित राहणार आहेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील उल्लेखनीय योगदानासाठी निवडक पत्रकार व संस्था यांना गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये वरिष्ठ पत्रकार अरविंद श्रीधर कोकजे (रत्नागिरी), उल्लेखनीय कार्याबद्दल प्रिंट मीडियातील श्रीराम अनंत पुरोहित (कर्जत), इलेक्ट्रॉनिक मीडियातील विजय सबाजी गावकर (सिंधुदुर्ग) आणि सोशल मीडियासाठी संदेश सोमा फडकले यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा व राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विश्व संवाद केंद्राचे दृढविश्वास आहे की पत्रकारिता केवळ माहितीचा वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षी नारद पत्रकार सन्मान आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर (माजी निवासी संपादक- लोकसत्ता) यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिष्ठित परीक्षक सदस्यांसह प्रसाद काथे (संपादक, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल), विनायक पात्रुडकर (माजी संपादक – दैनिक लोकमत), सरिता कौशिक (कार्यकारी संपादक – एबीपी माझा) मिलिंद भागवत (माजी संपादक – आयबीएन लोकमत) आणि प्रणव भोंदे (मीडिया सल्लागार) यांच्याद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
रत्नागिरी : विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पुरस्कारांची घोषणा
