रत्नागिरी – गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या आणि कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषदेने सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाची दुरवस्था आणि त्यामुळे जनतेला होणारा त्रास सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.
गेल्या १५ वर्षांत अनेक सरकारं बदलली, पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम मात्र काही पूर्ण झाले नाही. प्रत्येक वेळी फक्त आश्वासने आणि नवीन तारखा जाहीर केल्या जातात. यामुळे कोकणातील जनतेला अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीने पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीत १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निवळी येथे शांततेत आंदोलन करण्याचे ठरले आहे. यामध्ये रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनातून सरकारकडे एकच प्रमुख मागणी करण्यात येणार आहे ती म्हणजे, तोंडावर आलेल्या गणपती सणापूर्वी महामार्गाची किमान तात्पुरती डागडुजी तरी करावी. गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना प्रवास करताना त्रास होऊ नये, हीच या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे. या निदर्शनांमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही, कारण पत्रकार रस्त्याच्या बाजूला उभे राहून आंदोलन करणार आहेत, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही परिषदेने या प्रश्नावर आवाज उठवला होता, पण सरकारकडून काहीच ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.