GRAMIN SEARCH BANNER

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून मुज्जफराबाद, पटियाला, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या पायथ्यापर्यंत विस्तारला आहे. तसेच तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. काही भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने गेले काही दिवस राज्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

तापमानात वाढ

गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली होती. काही भागात तापमान ३५ अंशावर होते. मुंबईतही तापमानाचा पारा चढाच होता. त्यामुळे गेले काही दिवस असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. काही भागात बुधवारी पाऊस पडल्याने तापमानात घट झाली आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी तापमानाचा पारा चढाच आहे.

वर्धा येथे सर्वाधिक

वर्धा येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३५.२ अंश सेल्सिअस, अमरावती ३५ अंश सेल्सिअस, ब्रम्हपुरी ३४.८ अंश सेल्सिअस, गोंदिया ३४.७ अंश सेल्सिअस आणि नागपूर येथे ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

पावसाचा अंदाज कुठे

मेघगर्जनेसह पाऊस – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
विजांसह पाऊस – भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज – मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना
कोणताही इशारा नाही – अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम

Total Visitor Counter

2455624
Share This Article