रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील नदीकिनारी असलेल्या जंगलमय भागात चालणाऱ्या गावठी दारूच्या हातभट्टीवर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास धाड टाकली. या कारवाईत दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत जगन्नाथ पंडये (वय ४२, रा. मिरजोळे पंडयेवाडी) आणि संदेश गणपत जाधव (वय ५३, रा. मिरजोळे बौद्धवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
मिरजोळे परिसरात नदीकिनारी जंगलमय भागात अनेक वर्षांपासून हातभट्टीवर गावठी दारू तयार केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी शहर पोलिसांनी दोन ठिकाणी अचानक छापा टाकला. या वेळी संशयित प्रत्यक्ष दारू तयार करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गूळ, नवसागर, विविध रासायनिक पदार्थ, पत्र्याच्या बॅरल्स, तसेच प्लास्टिक कॅनमधील तयार गावठी दारू असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.
रत्नागिरी : मिरजोळे पाटीलवाडी येथे हातभट्टीवर धाड : दोघांवर गुन्हा, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त






