GRAMIN SEARCH BANNER

अखेर ठरले: प्रशांत यादव भाजपत प्रवेश करणार;१९ ऑगस्टला सोहळा; ना. नितेश राणे यांची घोषणा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.

नितेश राणे म्हणाले, “प्रशांत यादव रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे. कार्यकर्ता म्हणून नाही, तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे, अनेकांना रोजगार दिला आहे. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे असा नेता आमच्या पक्षात आला, तर निश्चितच आम्हाला फायदा होईल.”

भाजपत प्रशांत यादवांचा प्रवेश १९ ऑगस्ट रोजी नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात होईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, “पालकमंत्री ना. उदय सामंत हे आमच्या मतदार संघातील ज्येष्ठ मंत्री आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु प्रशांत यादव यांनी योग्यता पाहून निर्णय घेतला. १९ तारखेला त्यांच्या प्रवेश सोहळ्यातून संघटना अधिक भक्कम होईल. त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळं मोठं असून ते तळागाळापर्यंत पोहोचले आहेत.” आमदार शेखर निकम हे आपल्याच महायुतीत आहेत, याबाबत विचारले असता प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही स्वबळावर लढलो, तरच आमची ताकद वाढेल, असेही ते म्हणाले.

या वेळी उपस्थित माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Total Visitor Counter

2475388
Share This Article